अंतापूर शिवारात सौर केबलनंतर आता ट्रॅक्टर चोरी

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : अंतापूर शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

पत्रकार अमर बाहशवान यांच्या अंतापुर गट क्रमांक ५ /१ शिवारातील शेतात ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात भामट्याने ट्रॅक्टर लंपास केल्याचे निदर्शनास आले. सकाळी ट्रॅक्टर चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत गंगापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. 

विशेष म्हणजे, यापूर्वीही याच शेतातून तीन वेळा सौरऊर्जा प्रकल्पाची केबल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेत परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व शेतमालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांकडून तपास सुरू असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. गंगापूर पोलिस तपास करत आहेत.